समास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
कर्मधारय समास
ज्या तत्पुरूष समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात, त्या समासाला कर्मधारय समास असे म्हणतात.
कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये
- कर्मधारय समास हा तत्पुरूष समासाचा एक प्रकार आहे.
- या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.
- या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष्य अशा स्वरूपाचा असतो.
- या समासातील दोन्ही पदांचा संबंध कधीकधी उपमान आणि उपमेय अशा स्वरूपाचा देखील असतो.
- या समासामध्ये कधी पूर्वपद विशेषण असते, तर कधी उत्तरपद विशेषण असते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
महाशक्ती = महान अशी शक्ती
महाशक्ती हा एक सामासिक शब्द आहे, तर महान अशी शक्ती हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद ‘महान’ हे विशेषण आहे.
तसेच, यामधील दुसरे पद ‘शक्ती’ हे एक नाम आहे.
या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ किंवा ‘उपमान – उपमेय’ स्वरूपाचा आहे.
त्यामुळे या समासास कर्मधारय समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
घनश्याम = घनासारखा श्याम
घनश्याम हा एक सामासिक शब्द आहे, तर घनासारखा श्याम हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील पहिले पद ‘घन’ हे विशेषण आहे.
तसेच, यामधील दुसरे पद ‘श्याम’ हे एक नाम आहे.
या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ किंवा ‘उपमान – उपमेय’ स्वरूपाचा आहे.
त्यामुळे या समासास कर्मधारय समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
पांढराशुभ्र = पांढरा आणि शुभ्र
पांढराशुभ्र हा एक सामासिक शब्द आहे, तर पांढरा आणि शुभ्र हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील दोन्हीही पदे ‘पांढरा’ तसेच ‘शुभ्र’ ही विशेषण असून या दोन्हीही पदांचा अर्थ जवळपास एकच होतो.
त्यामुळे या समासास कर्मधारय समास असे म्हणतात.
कर्मधारय समासाचे उपप्रकार
मराठी व्याकरणातील कर्मधारय समासाचे सहा उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. विशेषण – पूर्वपद कर्मधारय समास
या कर्मधारय समासामधील पहिले पद हे विशेषण असते.
उदाहरणार्थ – महादेव, नीलांबर, महाराष्ट्र, रक्तचंदन, तांबडीमाती इत्यादी
२. विशेषण – उत्तरपद कर्मधारय समास
या कर्मधारय समासामधील दुसरे पद हे विशेषण असते.
उदाहरणार्थ – घननील, पुरूषोत्तम, भाषांतर, विषयांतर, सर्वोत्तम इत्यादी
३. विशेषण – उभयपद कर्मधारय समास
या कर्मधारय समासामधील दोन्हीही पदे विशेषण असतात.
उदाहरणार्थ – लालभडक, पांढराशुभ्र, हिरवागार, काळाकुट्ट, काळाभोर इत्यादी
४. उपमान – पूर्वपद कर्मधारय समास
या कर्मधारय समासामधील पहिले पद हे उपमान असते.
उदाहरणार्थ – मातृमुखी, रेशीमधागा, पितृमुखी, कमलनयन, साखरपेरणी, चंद्रमुखी इत्यादी
५. उपमान – उत्तरपद कर्मधारय समास
या कर्मधारय समासामधील दुसरे पद हे उपमान असते.
उदाहरणार्थ – पदकमल, नरसिंह, मुखचंद्र इत्यादी
६. रूपक – उभयपद कर्मधारय समास
या कर्मधारय समासामधील दोन्हीही पदे एकरूप असतात.
उदाहरणार्थ – बोधामृत, कन्यारत्न, विद्याधन, काव्यामृत, ज्ञानामृत, पुत्ररत्न इत्यादी