विभक्ती म्हणजे काय?

वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो, त्याला मराठी व्याकरणामध्ये विभक्ती असे म्हणतात.

म्हणजेच, नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

विभक्तीचे प्रत्यय

नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी त्याला जी अक्षरे जोडण्यात येतात, त्या अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.

मराठी वाक्यात जे शब्द येतात, ते त्यांच्या मूळ रूपात जसेच्या तसे येत नाहीत. वाक्यामध्ये वापरताना शब्दांच्या मूळ स्वरूपांत बदल करावा लागतो.

उदाहरणार्थ,

रामाने रावणाला मारले.

वरील वाक्यामध्ये ने, ला हे विभक्तीचे प्रत्यय आहेत.

राम, रावण, मारणे हे शब्द एकापुढे एक ठेवल्याने काहीच अर्थबोध होत नाही. त्यासाठी शब्दांना योग्य ते प्रत्यय लावणे गरजेचे आहे.

अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी शब्दांना प्रत्यय लावून त्यांच्या स्वरूपांत बदल करून शब्दरचना करणे आवश्यक असते.

सामान्यरूप

विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो, त्याला सामान्यरूप असे म्हणतात.

पुढील तक्त्यामध्ये सामान्यरूप, विभक्तीचे प्रत्यय तसेच मूळ शब्दात कसा बदल होतो, हे दाखवले आहे.

मूळ शब्द सामान्यरूप विभक्तीचे प्रत्यय विभक्तीचे रूप
मांजर मांजरा ला मांजराला
शाळा शाळे ची शाळेची
झाड झाडा शी झाडाशी
पुस्तक पुस्तका ची पुस्तकाची
तो त्या ला त्याला

विभक्तीचे प्रकार

प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते, ज्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद हे प्रमुख घटक असतात.

क्रिया करणारा कर्ता, क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय.

नामाचा तसेच सर्वनामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध हा एकूण आठ प्रकारचा असतो.

म्हणून मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे पुढीलप्रमाणे एकूण आठ प्रकार मानले जातात

विभक्ती प्रत्यय (एकवचन) प्रत्यय (अनेकवचन)
प्रथमा प्रत्यय नाही प्रत्यय नाही
द्वितीया स, ला, ते स, ला, ना, ते
तृतीया ने, ए, शी नी, शी, ही
चतुर्थी स, ला, ते स, ला, ना, ते
पंचमी ऊन, हून ऊन, हून
षष्ठी चा, ची, चे चे, च्या, ची
सप्तमी त, ई, आ त, ई, आ
संबोधन प्रत्यय नाही नो

यांतील पहिल्या सात विभक्तींना संस्कृत नावे दिलेली आहेत. आठव्या विभक्तीचा उपयोग एखाद्याला हाक मारताना केला जातो, त्यामुळे तिला अष्टमी असे न म्हणता संबोधन असे नाव दिलेले आहे.

This article has been first posted on and last updated on by