समास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
द्वंद्व समास – विषय सूची
द्वंद्व समास
ज्या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान (महत्त्वाची) म्हणजेच समान दर्जाची असतात, त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात.
द्वंद्व समासाची काही वैशिष्ट्ये
- द्वंद्व समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.
- या समासामधील दोन्ही पदे समान दर्जाची असतात.
- या समासामधील सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो, तेव्हा ती पदे एकमेकांना उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत, असे लक्षात येते.
- यासाठी आणि, व, अथवा, किंवा यांपैकी एखादे उभयान्वयी अव्यय वापरले जाते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
मिसळपाव = मिसळ आणि पाव
मिसळपाव हा एक सामासिक शब्द आहे, तर मिसळ आणि पाव हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील ‘मिसळ’ आणि ‘पाव’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.
तसेच, ही दोन्ही पदे ‘आणि’ या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.
त्यामुळे या समासास द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
सत्यासत्य = सत्य किंवा असत्य
सत्यासत्य हा एक सामासिक शब्द आहे, तर सत्य किंवा असत्य हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील ‘सत्य’ आणि ‘असत्य’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.
तसेच, ही दोन्ही पदे ‘किंवा’ या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.
त्यामुळे या समासास द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
स्त्रीपुरूष = स्त्री व पुरूष
स्त्रीपुरूष हा एक सामासिक शब्द आहे, तर स्त्री व पुरूष हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील ‘स्त्री’ आणि ‘पुरूष’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.
तसेच, ही दोन्ही पदे ‘व’ या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.
त्यामुळे या समासास द्वंद्व समास असे म्हणतात.
द्वंद्व समासाची इतर काही उदाहरणे
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
राधाकृष्ण | राधा आणि कृष्ण |
चेंडूफळी | चेंडू व फळी |
आईबाप | आई व बाप |
बहीणभाऊ | बहिण व भाऊ |
चारपाच | चार किंवा पाच |
पासनापास | पास अथवा नापास |
मागेपुढे | मागे वा पुढे |
धर्माधर्म | धर्म अथवा अधर्म |
खरेखोटे | खरे किंवा खोटे |
न्यायान्याय | न्याय अथवा अन्याय |
वेणीफणी | वेणी, फणी व इतर साज शृंगार |
चटणीभाकर | चटणी, भाकर व इतर पदार्थ |
केरकचरा | केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ |
खाणेपिणे | खाणे, पिणे व इतर पदार्थ |
द्वंद्व समासाचे उपप्रकार
मराठी व्याकरणातील द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. इतरेतर द्वंद्व समास
यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ यांपैकी एखादे उभयान्वयी अव्यय वापरले जाते.
उदाहरणार्थ – मायबाप, राधाकृष्ण, चेंडूफळी, विटीदांडू इत्यादी
२. वैकल्पिक द्वंद्व समास
यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना ‘किंवा’, ‘अथवा’ यांपैकी एखादे उभयान्वयी अव्यय वापरले जाते.
उदाहरणार्थ – चारपाच, पासनापास, धर्माधर्म, खरेखोटे इत्यादी
३. समाहार द्वंद्व समास
यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश केला जातो.
उदाहरणार्थ – भाजीपाला, केरकचरा, चटणीभाकर, चहापाणी इत्यादी