समास आणि विग्रह आणि द्वंद्व समास हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
समाहार द्वंद्व समास
ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो, त्या समासाला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
समाहार द्वंद्व समासाची काही वैशिष्ट्ये
- समाहार द्वंद्व समास हा द्वंद्व समासाचा एक प्रकार आहे.
- या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.
- या समासामधील दोन्ही पदे समान दर्जाची असतात.
- या समासामधील सामासिक शब्दाचा विग्रह केला असता त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
भाजीपाला = भाजी, पाला, कडीपत्ता, मिरची, कोथिंबीर, आले यांसारख्या इतर वस्तू
भाजीपाला हा एक सामासिक शब्द आहे, तर भाजी, पाला, कडीपत्ता, मिरची, कोथिंबीर, आले यांसारख्या इतर वस्तू हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यामध्ये केवळ भाजीचा समावेश न करता त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश किंवा समाहार केलेला आहे.
त्यामुळे या समासास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
वेणीफणी = वेणी, फणी व इतर साज शृंगार
वेणीफणी हा एक सामासिक शब्द आहे, तर वेणी, फणी व इतर साज शृंगार हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यामध्ये वेणी, फणी व इतर साज शृंगार यांचाही समावेश किंवा समाहार केलेला आहे.
त्यामुळे या समासास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
भांडीकुंडी = भांडी, कुंडी तसेच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर वस्तू - कढई, सुरी, चमचे, पातेले इत्यादी
भांडीकुंडी हा एक सामासिक शब्द आहे, तर भांडी, कुंडी तसेच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर वस्तू, कढई, सुरी, चमचे, पातेले इत्यादी हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यामध्ये केवळ भांड्यांचा समावेश न करता स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर वस्तूंचाही समावेश किंवा समाहार केलेला आहे.
त्यामुळे या समासास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
चहापाणी = चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ - पोहे, उपमा इत्यादी
चहापाणी हा एक सामासिक शब्द आहे, तर चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ - पोहे, उपमा इत्यादी हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यामध्ये केवळ चहाचा समावेश न करता स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इतर वस्तूंचाही समावेश किंवा समाहार केलेला आहे.
त्यामुळे या समासास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात.
समाहार द्वंद्व समासाची इतर उदाहरणे
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
चटणीभाकर | चटणी, भाकर व इतर पदार्थ |
अंथरूणपांघरूण | अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर कपडे |
केरकचरा | केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ |
खाणेपिणे | खाणे, पिणे व इतर पदार्थ |