स्वरांच्या मात्रा – विषय सूची
मुख्य स्वर
मराठी व्याकरणामध्ये एकूण बारा मुख्य स्वर असून त्या प्रत्येक स्वराला स्वतःची एक मात्रा असते.
स्वराची मात्रा जेव्हा एखाद्या व्यंजनाला जोडण्यात येते, तेव्हा त्यापासून एक नवीन अक्षर तयार होते.
मुख्य स्वरांच्या मात्रा
कोणत्याही व्यंजनाची बाराखडी पूर्ण करताना मुख्य स्वरांच्या पुढील मात्रांचा उपयोग केला जातो.
| मुख्य स्वर | मुख्य स्वराची मात्रा |
|---|---|
| अ | मात्रा नाही |
| आ | ा (काना) |
| इ | ि (पहिली वेलांटी) |
| ई | ी (दुसरी वेलांटी) |
| उ | ु (पहिला उकार) |
| ऊ | ू (दुसरा ऊकार) |
| ए | े (एक मात्रा) |
| ऐ | ै (दोन मात्रा) |
| ओ | ो (एक काना एक मात्रा) |
| औ | ौ (एक काना दोन मात्रा) |
| अं | ं (अनुस्वार) |
| अः | : (विसर्ग) |
अतिरिक्त स्वर
इंग्रजी भाषेमधून मराठीमध्ये आलेल्या स्वरांना आपण अतिरिक्त स्वर असे म्हणू शकतो.
या स्वरांचा उपयोग सामान्यतः इंग्रजी भाषेतील शब्द किंवा त्यांचे उच्चार दर्शविण्यासाठी केला जातो.
इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले हे दोन अतिरिक्त स्वर पुढीलप्रमाणे आहेत.
| अतिरिक्त स्वर | अतिरिक्त स्वराची मात्रा |
|---|---|
| अॅ | ॅ (अर्धचंद्र) |
| ऑ | ाॅ (काना आणि अर्धचंद्र) |
चौदाखडी
वर दर्शविलेले बारा मुख्य स्वर आणि इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेले दोन अतिरिक्त स्वर जेव्हा एखाद्या व्यंजनाला जोडले जातात, तेव्हा त्यांपासून तयार होणाऱ्या चौदा अक्षरांना चौदाखडी असे म्हणतात.