विभक्ती तत्पुरूष समास


तत्पुरूष समासाचे प्रकार



समास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

विभक्ती तत्पुरूष समास

ज्या तत्पुरूष समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन शब्द किंवा पदे एकमेकांना जोडली जातात, त्याला विभक्ती तत्पुरूष समास असे म्हणतात.

विभक्ती तत्पुरूष समासाची काही वैशिष्ट्ये

  • विभक्ती तत्पुरूष समास हा तत्पुरूष समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामध्ये प्रथमा विभक्तीचा उपयोग केला जात नाही.
  • या समासामध्ये प्रथमा विभक्ती सोडून इतर सर्व विभक्तीचे प्रत्यय वापरलेले असतात.
  • एखाद्या विभक्तीचा प्रत्यय जोडून अशा सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो.
  • या समासामध्ये विभक्ती नुसार तत्पुरूष समासाला विभक्तीचे नाव दिले जाते.

द्वितीया तत्पुरूष समास

द्वितीया तत्पुरूष समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना द्वितीया विभक्तीचा उपयोग केलेला असतो.

उदाहरणार्थ,

सुखप्राप्त = सुखाला प्राप्त

सुखप्राप्त हा एक सामासिक शब्द आहे, तर सुखाला प्राप्त हा त्याचा विग्रह आहे.

सुखाला हे एक शब्दयोगी अव्यय असून त्याला “ला” हा द्वितीया विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे.

परंतु, सामासिक शब्द तयार होताना “ला” या प्रत्ययाचा लोप होतो आणि दुसरे पद जोडून सुखप्राप्त हा सामासिक शब्द तयार होतो.

त्यामुळे त्याला द्वितीया तत्पुरूष समास असे म्हणतात.

द्वितीया तत्पुरूष समासाची इतर काही उदाहरणे –

सामासिक शब्द विग्रह द्वितीया विभक्ती प्रत्यय
देवाश्रित देवाला आश्रित ला
कृष्णार्पण कृष्णाला अर्पण ला
ईश्वरसाक्षी ईश्वरास साक्षी

तृतीया तत्पुरूष समास

तृतीया तत्पुरूष समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना तृतीया विभक्तीचा उपयोग केलेला असतो.

उदाहरणार्थ,

सुखहीन = सुखाने हीन

सुखहीन हा एक सामासिक शब्द आहे, तर सुखाने हीन हा त्याचा विग्रह आहे.

सुखाने हे एक शब्दयोगी अव्यय असून त्याला “ने” हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे.

परंतु, सामासिक शब्द तयार होताना “ने” या प्रत्ययाचा लोप होतो आणि दुसरे पद जोडून सुखहीन हा सामासिक शब्द तयार होतो.

त्यामुळे त्याला तृतीया तत्पुरूष समास असे म्हणतात.

तृतीया तत्पुरूष समासाची इतर काही उदाहरणे –

सामासिक शब्द विग्रह तृतीया विभक्ती प्रत्यय
तोंडपाठ तोंडाने पाठ ने
दर्जाहीन दर्जाने हीन ने
जलयुक्त जलाने युक्त ने
रंगमिश्रित रंगाने मिश्रित ने

चतुर्थी तत्पुरूष समास

चतुर्थी तत्पुरूष समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना चतुर्थी विभक्तीचा उपयोग केलेला असतो.

उदाहरणार्थ,

लोकांर्पण = लोकांना अर्पण

लोकांर्पण हा एक सामासिक शब्द आहे, तर लोकांना अर्पण हा त्याचा विग्रह आहे.

लोकांना हे एक शब्दयोगी अव्यय असून त्याला “ना” हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे.

परंतु, सामासिक शब्द तयार होताना “ना” या प्रत्ययाचा लोप होतो आणि दुसरे पद जोडून लोकांर्पण हा सामासिक शब्द तयार होतो.

त्यामुळे त्याला चतुर्थी तत्पुरूष समास असे म्हणतात.

चतुर्थी तत्पुरूष समासाची इतर काही उदाहरणे –

सामासिक शब्द विग्रह चतुर्थी विभक्ती प्रत्यय
कमरपट्टा कमरेस पट्टा
पूजाद्रव्य पूजेला द्रव्य ला
व्याहीभोजन व्याहींना भोजन ना

पंचमी तत्पुरूष समास

पंचमी तत्पुरूष समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना पंचमी विभक्तीचा उपयोग केलेला असतो.

उदाहरणार्थ,

भयमुक्त = भयातून मुक्त

भयमुक्त हा एक सामासिक शब्द आहे, तर भयातून मुक्त हा त्याचा विग्रह आहे.

भयातून हे एक शब्दयोगी अव्यय असून त्याला “तून” हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे.

परंतु, सामासिक शब्द तयार होताना “तून” या प्रत्ययाचा लोप होतो आणि दुसरे पद जोडून भयमुक्त हा सामासिक शब्द तयार होतो.

त्यामुळे त्याला पंचमी तत्पुरूष समास असे म्हणतात.

पंचमी तत्पुरूष समासाची इतर काही उदाहरणे –

सामासिक शब्द विग्रह पंचमी विभक्ती प्रत्यय
सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त तून
व्याधीमुक्त व्याधीपासून मुक्त ऊन
चोरभय चोरापासून भय ऊन

षष्ठी तत्पुरूष समास

षष्ठी तत्पुरूष समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना षष्ठी विभक्तीचा उपयोग केलेला असतो.

उदाहरणार्थ,

वनदेवी = वनाची देवी

वनदेवी हा एक सामासिक शब्द आहे, तर वनाची देवी हा त्याचा विग्रह आहे.

वनाची हे एक शब्दयोगी अव्यय असून त्याला “तून” हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे.

परंतु, सामासिक शब्द तयार होताना “ची” या प्रत्ययाचा लोप होतो आणि दुसरे पद जोडून वनदेवी हा सामासिक शब्द तयार होतो.

त्यामुळे त्याला षष्ठी तत्पुरूष समास असे म्हणतात.

षष्ठी तत्पुरूष समासाची इतर काही उदाहरणे –

सामासिक शब्द विग्रह षष्ठी विभक्ती प्रत्यय
सिनेमागृह सिनेमाचे गृह चे
लोकहित लोकांचे हित चे
गावदेवी गावची देवी ची
राजकन्या राजाची कन्या ची
भूमीपुत्र भूमीचा पुत्र चा
विहिरीलगत विहिरीच्या लगत च्या
फुलदाणी फुलांची दाणी ची

सप्तमी तत्पुरूष समास

सप्तमी तत्पुरूष समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना सप्तमी विभक्तीचा उपयोग केलेला असतो.

उदाहरणार्थ,

घरगडी = घरातील गडी

घरगडी हा एक सामासिक शब्द आहे, तर घरातील गडी हा त्याचा विग्रह आहे.

घरातील हे एक शब्दयोगी अव्यय असून त्याला “ती” (त + ई) हा सप्तमी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे.

परंतु, सामासिक शब्द तयार होताना “ती” या प्रत्ययाचा लोप होतो आणि दुसरे पद जोडून घरगडी हा सामासिक शब्द तयार होतो.

त्यामुळे त्याला सप्तमी तत्पुरूष समास असे म्हणतात.

सप्तमी तत्पुरूष समासाची इतर काही उदाहरणे –

सामासिक शब्द विग्रह सप्तमी विभक्ती प्रत्यय
कलाकुशल कलेत कुशल
विद्यापारंगत विद्येत पारंगत
कैलासवासी कैलासात वास करणारा
पाणकोंबडा पाण्यातील कोंबडा ती

This article has been first posted on and last updated on by