समास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

बहुव्रीही समास

ज्या सामासिक शब्दातील कोणतेही पद अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसून त्या पदांच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा नामाचा किंवा वस्तूचा त्या शब्दामधून बोध होतो समासाला ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

किंवा

ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रधान (महत्त्वाची) नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो; तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते, त्या समासाला ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

बहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये

  • बहुव्रीही समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसतात.
  • या समासामधील दोन्ही पदांमधून तिसऱ्या एखाद्या पदाचा बोध होतो.
  • या समासामधील सामासिक शब्द हे त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

पवनसुत = पवनाचा सुत (मुलगा) (म्हणजेच मारूती किंवा हनुमान)

‘पवनसुत’ हा एक सामासिक शब्द आहे, तर ‘पवनाचा सुत’ हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘पवन’ आणि ‘सुत’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची नाहीत.

या सामासिक शब्दातून ‘मारूती’ किंवा ‘हनुमान’ या तिसऱ्याच पदाचा बोध होतो.

तसेच, ‘मारूती’ या तिसऱ्या पदाचे ‘पवनसुत’ हे एक विशेषण आहे.

त्यामुळे या समासास ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

उमापती = उमाचा (पार्वतीचा) पती (म्हणजेच शंकर)

उमापती हा एक सामासिक शब्द आहे, तर उमाचा पती हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘उमा’ आणि ‘पती’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची नाहीत.

या सामासिक शब्दातून ‘शंकर’ या तिसऱ्याच पदाचा बोध होतो.

तसेच, ‘शंकर’ या तिसऱ्या पदाचे ‘उमापती’ हे एक विशेषण आहे.

त्यामुळे या समासास ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

लंबोदर = लंब (मोठे) आहे उदर (पोट) ज्याचे तो (म्हणजेच गणपती)

लंबोदर हा एक सामासिक शब्द आहे, तर लंब आहे उदर ज्याचे तो हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘लंब’ आणि ‘उदर’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची नाहीत.

या सामासिक शब्दातून ‘गणपती’ या तिसऱ्याच पदाचा बोध होतो.

तसेच, ‘गणपती’ या तिसऱ्या पदाचे ‘लंबोदर‘ हे एक विशेषण आहे.

त्यामुळे या समासास ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

सिंहारूढ = सिंहावर आरूढ असलेली किंवा सिंह जिचे वाहन आहे अशी ती (म्हणजेच अंबामाता किंवा दुर्गा)

सिंहारूढ हा एक सामासिक शब्द आहे, तर सिंहावर आरूढ असलेली किंवा सिंह जिचे वाहन आहे अशी ती हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘सिंह’ आणि ‘आरूढ’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची नाहीत.

या सामासिक शब्दातून ‘अंबामाता’ किंवा ‘दुर्गा’ या तिसऱ्याच पदाचा बोध होतो.

तसेच, ‘अंबामाता’ किंवा ‘दुर्गा’ या तिसऱ्या पदाचे ‘सिंहारूढ’ हे एक विशेषण आहे.

त्यामुळे या समासास ‘बहुव्रीही समास’ असे म्हणतात.

सामासिक शब्दाचा निश्चित अर्थ

विघ्नहर्ता आमचे दुःख दूर करेल.

वरील वाक्यामध्ये ‘विघ्नहर्ता’ हा एक सामासिक शब्द असून त्याचा अर्थ ‘विघ्न दूर करणारा असा तो (म्हणजेच गणपती)’ असा आहे. त्यामुळे तो ‘बहुव्रीही समास’ आहे.

आता आपण पुढील वाक्य लक्षात घेऊया.

विघ्नहर्ता इमारत आमच्या घराच्या जवळ आहे.

वरील वाक्यामध्ये ‘विघ्नहर्ता’ हा शब्द नाम म्हणून वापरण्यात आला आहे.

यावरून असे दिसते की सामासिक शब्दाचा वाक्यातील अर्थ निश्चित करताना ते वाक्य नीट वाचून मगच त्या शब्दाचा अर्थ आणि समास निश्चित करावा लागतो.

बहुव्रीही समासाची इतर काही उदाहरणे

सामासिक शब्द विग्रह
चंद्रशेखर चंद्र आहे ज्याच्या माथ्यावर असा तो
मूषकवाहन मूषक आहे वाहन ज्याचे असा तो
वक्रतुंड वक्र (वाकडे) आहे तुंड (तोंड) ज्याचे असा तो
दशमुख दहा आहेत मुख ज्याला असा तो
जितेंद्रिय जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो
निर्धन निर्गत (गेले) आहे ज्याच्यापासून धन असा तो
निर्बल निर्गत (गेले) आहे ज्याच्यापासून बळ असा तो
लब्धदृष्टी लब्ध आहे दृष्टीने असा तो
पद्मनाभ पद्म आहे नाभीत (बेंबीत) ज्याच्या असा तो
भालचंद्र भाळी आहे चंद्र ज्याच्या असा तो
अखंड नाही खंड ज्याला असा ते
अनियमित नाही नियमित असे ते
निर्मल नाही मळ ज्यात असे ते
अज्ञान नाही ज्ञान ज्याला असा तो
निर्मल नाही मळ ज्यात असे ते
सुमंगल पवित्र आहे असे ते
सुलोचना सुंदर आहेत लोचन (डोळे) जिचे अशी ती
विख्यात विशेष ख्याती आहे ज्याची असा तो
प्रज्ञावंत आहे प्रज्ञा (बुद्धी) ज्याच्याकडे असा तो
विधवा नाही सधवा अशी ती
सहपरिवार परिवारा सहित
सपत्नीक पत्नी सहित
सादर आदराने सहित

बहुव्रीही समासाचे उपप्रकार

मराठी व्याकरणातील बहुव्रीही समासाचे चार मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१. विभक्ती बहुव्रीही समास

यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच्या शेवटी एखादे संबंधी सर्वनाम येते आणि त्याच्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते.

उदाहरणार्थ – लंबोदर, प्रात्तधन, मूषकवाहन, पद्मनाभ, चंद्रशेखर, पांडुरंग इत्यादी

अधिक माहिती

२. नञ बहुव्रीही समास

यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याचे पहिले पद नकारदर्शक असते.

उदाहरणार्थ – अखंड, नीरस, अनियमित, निर्धन, अज्ञानी, अव्यय इत्यादी

अधिक माहिती

३. सहबहुव्रीही समास

यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याचे पहिले पद ‘स’ किंवा ‘सह’ यांपैकी एखादे अव्यय असते.

उदाहरणार्थ – सबल, सपत्नीक, सादर, सहपरिवार, सहकुटुंब, सत्वर इत्यादी

अधिक माहिती

४. प्रादिबहुव्रीही समास

यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याचे पहिले पद ‘प्र’, ‘परा’, ‘अप’, ‘दुर’, ‘सु’, ‘वि’ अशा उपसर्गांनी युक्त असते.

उदाहरणार्थ – विख्यात, सुमंगल, प्रज्ञावंत, सुलोचना, विधवा, दुर्गुणी इत्यादी

अधिक माहिती

This article has been first posted on and last updated on by