'उभयान्वयी अव्यय' म्हणजे काय?
'उभयान्वयी अव्यय' म्हणजे काय?
मराठी व्याकरणातील दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला 'उभयान्वयी अव्यय' असे म्हणतात.
काही वैशिष्ट्ये
उभयान्वयी अव्ययाची काही वैशिष्ट्ये
- उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये एकत्र करण्याचे किंवा जोडण्याचे काम करतात.
- उभयान्वयी अव्यय हे फक्त शब्द किंवा वाक्ये एकमेकांना जोडण्याचे काम करते. वाक्यात इतर कोणतेही कार्य ते करत नाही.
- आणि, व, शिवाय, त्यामुळे, परंतु, अथवा ही उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे आहेत.
-
जसा-तसा, जितका-तितका, जिथे-तिथे असे काही विकारी शब्द वाक्ये जोडण्याचे काम करतात; पण ती अव्यये नाहीत.
- 'जिथे समाधान तिथे शांती' या वाक्यामध्ये 'जिथे-तिथे' ही संबंधी विशेषणे आहेत. ती समाधान आणि शांती या दोन शब्दांना जोडण्याचे कार्य करत आहेत.
- पण ते विकारी शब्द आहेत. ती अव्यये नाहीत. म्हणून त्यांना उभयान्वयी अव्यये असे म्हणता येणार नाही.
वाक्यातील उपयोग
उभयान्वयी अव्ययाचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
- हर्षदा एकाचवेळी वडे व भजी तळत होती.
वरील वाक्यात 'व' हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये 'व' हे उभयान्वयी अव्यय 'वडे' आणि 'भजी' या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.
उदाहरण क्र. २
- मिनूने ताटातले सगळे पदार्थ खाल्ले पण कारल्याची भाजी खाल्ली नाही.
वरील वाक्यात 'पण' हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये 'पण' हे उभयान्वयी अव्यय 'मिनूने ताटातले सगळे पदार्थ खाल्ले' आणि 'कारल्याची भाजी खाल्ली नाही' या दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत आहे.
उदाहरण क्र. ३
मी बाहेर पडले अन् पाऊस सुरू झाला.
वरील वाक्यात 'अन्' हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये 'अन्' हे उभयान्वयी अव्यय 'मी बाहेर पडले' आणि 'पाऊस सुरू झाला' या दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत आहे.
उदाहरण क्र. ४
रोहितने आज इडली व डोसा खाल्ला.
वरील वाक्यात 'व' हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये 'व' हे उभयान्वयी अव्यय 'इडली' आणि 'डोसा' या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.
काही उदाहरणे
उभयान्वयी अव्ययाची इतर काही उदाहरणे
- मी भात शिजवला आणि आमटीला फोडणी दिली.
- आज मी बाजारातून गहू, तांदूळ अन् बाजरी विकत घेतली.
- स्वराने नृत्य केले; शिवाय गाणेही गायले.
- कल्पनाने गाण्याचा खूप रियाज केला; म्हणून तिचे गाणे छान झाले.
- पावसाला सुरूवात झाली आणि मोर नाचायला लागला.
- शाळेची घंटा वाजली अन् मुलांचा किलबिलाट सुरू झाला.
उभयान्वयी अव्ययाचे प्रकार
उभयान्वयी अव्ययाचे प्रकार
उभयान्वयी अव्ययाचे 'दोन' मुख्य प्रकार आहेत.
१. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
समान दर्जाच्या किंवा स्वतंत्र अशा दोन वाक्यांना जोडणारे उभयान्वयी अव्यय.
२. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय
मुख्य वाक्य आणि गौण वाक्य अशा दोन वाक्यांना जोडणारे उभयान्वयी अव्यय.