समास आणि विग्रह आणि द्वंद्व समास हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
वैकल्पिक द्वंद्व समास
ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’ यांपैकी एखाद्या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो, त्या समासाला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.
वैकल्पिक द्वंद्व समासाची काही वैशिष्ट्ये
- वैकल्पिक द्वंद्व समास हा द्वंद्व समासाचा एक प्रकार आहे.
- या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.
- या समासामधील दोन्ही पदे समान दर्जाची असतात.
- या समासामधील सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो, तेव्हा ती पदे एकमेकांना ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’ यांपैकी एखाद्या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत, असे लक्षात येते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
चारपाच = चार किंवा पाच
चारपाच हा एक सामासिक शब्द आहे, तर चार किंवा पाच हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील ‘चार’ आणि ‘पाच’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.
तसेच, ही दोन्ही पदे ‘किंवा’ या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.
त्यामुळे या समासास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
पासनापास = पास अथवा नापास
पासनापास हा एक सामासिक शब्द आहे, तर पास अथवा नापास हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील ‘पास’ आणि ‘नापास’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.
तसेच, ही दोन्ही पदे ‘अथवा’ या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.
त्यामुळे या समासास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
मागेपुढे = मागे वा पुढे
मागेपुढे हा एक सामासिक शब्द आहे, तर मागे वा पुढे हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील ‘मागे’ आणि ‘पुढे’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.
तसेच, ही दोन्ही पदे ‘वा’ या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.
त्यामुळे या समासास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
सत्यासत्य = सत्य किंवा असत्य
सत्यासत्य हा एक सामासिक शब्द आहे, तर सत्य किंवा असत्य हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दातील ‘सत्य’ आणि ‘असत्य’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.
तसेच, ही दोन्ही पदे ‘किंवा’ या वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत.
त्यामुळे या समासास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.
वैकल्पिक द्वंद्व समासाची इतर उदाहरणे
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
धर्माधर्म | धर्म अथवा अधर्म |
खरेखोटे | खरे किंवा खोटे |
भलेबुरे | भले वा बुरे |
पाचपन्नास | पाच वा पन्नास |
दोनचार | दोन किंवा चार |
न्यायान्याय | न्याय अथवा अन्याय |