क्रियापद, वचन, लिंग आणि विभक्ती हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून प्रयोग आणि त्याचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
भावे प्रयोग
वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला ‘प्रयोग’ असे म्हणतात.
जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलत नाही, तसेच ते नेहमीच तृतीय पुरूषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, त्यास ‘भावे प्रयोग’ असे म्हणतात.
भावे प्रयोगाची काही वैशिष्ट्ये
- भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप बदलत नाही.
- भावे प्रयोगात कर्ता हा तृतीया विभक्ती किंवा चतुर्थी विभक्तीचा असतो.
- भावे प्रयोगात कर्म हे द्वितीया विभक्तीत असते.
- भावे प्रयोगात क्रियापद हे तृतीयपुरूषी एकवचनी असते.
- भावे प्रयोगात क्रियापद हे नपुंसकलिंगी असते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
आईने | मला | शिकवले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
वरील वाक्याचा प्रयोग हा ‘भावे प्रयोग’ आहे.
वाक्यातील कर्ता किंवा कर्माचे लिंग, वचन, पुरूष बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलत नाही.
सूरजने | मला | शिकवले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
सर्वांनी | मला | शिकवले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्ता ‘आईने’ हे एकवचनी स्त्रीलिंगी नाम आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘शिकवले’ असे आहे.
या कर्त्याच्या ठिकाणी ‘सूरजने’ हा पुल्लिंगी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘शिकवले’ असेच राहते.
तसेच, मूळ कर्त्याच्या ठिकाणी ‘सर्वांनी’ हा अनेकवचनी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘शिकवले’ असेच राहते.
कर्त्याच्या रूपात (लिंगात किंवा वचनात) बदल केला तरी क्रियापद हे तृतीयपुरूषी नपुंसकलिंगी एकवचनीच राहते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलत नाही.
आईने | मुलांना | शिकवले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
आईने | सुनिताला | शिकवले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्म ‘मला’ हे एकवचनी सर्वनाम आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘शिकवले’ असे आहे.
या कर्माच्या ठिकाणी ‘सुनिताला’ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवले तरीही क्रियापदाचे रूप ‘शिकवले’ असेच राहते.
तसेच, मूळ कर्माच्या ठिकाणी ‘मुलांना’ हे अनेकवचनी कर्म ठेवले तरीही क्रियापदाचे रूप ‘शिकवले’ असेच राहते.
कर्माच्या रूपात (लिंगात किंवा वचनात) बदल केला तरी क्रियापद हे तृतीयपुरूषी नपुंसकलिंगी एकवचनीच राहते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलत नाही.
उदाहरण क्र. २
शिपायाने | चोरास | मारले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
वरील वाक्याचा प्रयोग हा ‘भावे प्रयोग’ आहे.
वाक्यातील कर्ता किंवा कर्माचे लिंग, वचन, पुरूष बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलत नाही.
स्वरांगीने | चोरास | मारले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
सर्वांनी | चोरास | मारले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्ता ‘शिपायाने’ हे एकवचनी पुल्लिंगी नाम आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘मारले’ असे आहे.
या कर्त्याच्या ठिकाणी ‘स्वरांगीने’ हा स्त्रीलिंगी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘मारले’ असेच राहते.
तसेच, मूळ कर्त्याच्या ठिकाणी ‘सर्वांनी’ हा अनेकवचनी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘मारले’ असेच राहते.
कर्त्याच्या रूपात (लिंगात किंवा वचनात) बदल केला तरी क्रियापद हे तृतीयपुरूषी नपुंसकलिंगी एकवचनीच राहते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलत नाही.
शिपायाने | वाघिणीस | मारले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
शिपायाने | प्राण्यांना | मारले. |
(कर्ता) | (कर्म) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्म ‘चोरास’ हे एकवचनी नाम आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘मारले’ असे आहे.
या कर्माच्या ठिकाणी ‘वाघिणीस’ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवले तरीही क्रियापदाचे रूप ‘मारले’ असेच राहते.
तसेच, मूळ कर्माच्या ठिकाणी ‘प्राण्यांना’ हे अनेकवचनी कर्म ठेवले तरीही क्रियापदाचे रूप ‘मारले’ असेच राहते.
कर्माच्या रूपात (लिंगात किंवा वचनात) बदल केला तरी क्रियापद हे तृतीयपुरूषी नपुंसकलिंगी एकवचनीच राहते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलत नाही.
उदाहरण क्र. ३
त्याला | आता | करमते. |
(कर्ता) | (क्रियाविशेषण अव्यय) | (क्रियापद) |
वरील वाक्यामध्ये कर्म नाहीये. त्यामुळे कर्त्याचे वचन आणि लिंग बदलून प्रयोग ओळखता येतो.
वाक्यातील कर्त्याचे लिंग, वचन, पुरूष बदलून या वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलत नाही.
त्यामुळे वरील वाक्याचा प्रयोग हा ‘भावे प्रयोग’ आहे.
तिला | आता | करमते. |
(कर्ता) | (क्रियाविशेषण अव्यय) | (क्रियापद) |
त्यांना | आता | करमते. |
(कर्ता) | (क्रियाविशेषण अव्यय) | (क्रियापद) |
मला | आता | करमते. |
(कर्ता) | (क्रियाविशेषण अव्यय) | (क्रियापद) |
मूळ वाक्यातील कर्ता ‘त्याला’ हे तृतीयपुरूषी एकवचनी पुल्लिंगी सर्वनाम आहे तर वाक्यातील क्रियापदाचे रूप ‘करमते’ असे आहे.
या कर्त्याच्या ठिकाणी ‘तिला’ हा स्त्रीलिंगी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘करमते’ असेच राहते.
मूळ कर्त्याच्या ठिकाणी ‘त्यांना’ हा अनेकवचनी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘करमते’ असेच राहते.
तसेच, कर्त्याच्या ठिकाणी ‘मला’ हा प्रथमपुरूषी कर्ता ठेवला तरीही क्रियापदाचे रूप ‘करमते’ असेच राहते.
कर्त्याच्या रूपात कोणताही बदल केला तरी क्रियापद हे तृतीयपुरूषी नपुंसकलिंगी एकवचनीच राहते.
म्हणजेच, वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलत नाही.