संयुक्त वाक्य
मराठी व्याकरणात जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा जे एक जोडवाक्य तयार होते, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात.
संयुक्त वाक्याची काही वैशिष्ट्ये
- संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा अधिक विधाने असतात.
- संयुक्त वाक्यामधील प्रत्येक विधान हे एक स्वतंत्र केवल वाक्य असते.
- संयुक्त वाक्यामधील केवल वाक्ये ही जरी प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असली, तरी ही जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात.
- दोन किंवा अधिक मिश्र वाक्ये ही जर प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतील, तर त्यांसही संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
मला ताप होता; म्हणून मी शाळेत गेलो नाही.
वरील वाक्यामध्ये दोन केवल वाक्ये एकत्र जोडलेली आहेत.
- पहिले वाक्य – मला ताप होता.
- दुसरे वाक्य – मी शाळेत गेलो नाही.
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी म्हणून या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. २
रमेश आज सकाळी फिरायला जाणार होता; पण त्याला जागच आली नाही.
वरील वाक्यामध्ये दोन केवल वाक्ये एकत्र जोडलेली आहेत.
- पहिले वाक्य – रमेश आज सकाळी फिरायला जाणार होता.
- दुसरे वाक्य – त्याला जागच आली नाही.
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी पण या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ३
विवेक परीक्षा संपल्यानंतर गावी जाईल किंवा फिरायला जाईल.
वरील वाक्यामध्ये दोन केवल वाक्ये एकत्र जोडलेली आहेत.
या वाक्यात विकल्प दर्शविलेला असून दोन पर्याय दिलेले आहेत.
- पहिला पर्याय – विवेक परीक्षा संपल्यानंतर गावी जाईल.
- दुसरा पर्याय – विवेक परीक्षा संपल्यानंतर फिरायला जाईल.
हे दोन पर्याय एकत्र जोडण्यासाठी किंवा या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ४
मी रोज सकाळी योगासने करते व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.
वरील वाक्यामध्ये दोन केवल वाक्ये एकत्र जोडलेली आहेत.
- पहिले वाक्य – मी रोज सकाळी योगासने करते.
- दुसरे वाक्य – मी रोज सकाळी अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.
ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी व या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ५
घरी असताना मी वाचन करतो किंवा गाण्याचा रियाज करतो.
वरील वाक्यामध्ये दोन केवल वाक्ये एकत्र जोडलेली आहेत.
या वाक्यात विकल्प दर्शविलेला असून दोन पर्याय दिलेले आहेत.
- पहिला पर्याय – घरी असताना मी वाचन करतो.
- दुसरा पर्याय – घरी असताना मी गाण्याचा रियाज करतो.
हे दोन पर्याय एकत्र जोडण्यासाठी किंवा या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.
त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, असे समजावे.