संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?
मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषण क्रिया किती वेळा घडली आहे हे अथवा क्रिया घडण्याचे परिमाण दर्शविते, त्याला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
ज्या क्रियाविशेषणाने क्रिया किती वेळा घडली आहे, या निश्चित संख्येचा बोध होतो, त्याला संख्यावाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ – एकदा, दोनदा, चारदा, हजारदा इत्यादी.
ज्या क्रियाविशेषणाने क्रिया किती वेळा घडली आहे, या निश्चित संख्येचा बोध होत नाही, मात्र त्याचे परिमाण कळते, त्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ – थोडाच, मोजकेच, काहीसा, अत्यंत इत्यादी.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
सरांनी सरिताची उत्तरपत्रिका चारदा तपासली.
या वाक्यामध्ये क्रिया किती वेळा घडत आहे याचा निश्चित बोध होतो आणि त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी चारदा हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
चारदा या शब्दामुळे वाक्यातील क्रिया चार वेळा घडली आहे असे समजते.
त्यामुळे, चारदा या शब्दाला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
दिपाली मोजकेच बोलते.
या वाक्यामध्ये क्रिया किती वेळा घडत आहे याचा निश्चित बोध होत नाही मात्र क्रिया घडण्याचे परिमाण दर्शविण्यासाठी मोजकेच हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
त्यामुळे, मोजकेच या शब्दाला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
गोरक्षने गाण्याचा हजारदा रियाज केला.
या वाक्यामध्ये क्रिया किती वेळा घडत आहे याचा निश्चित बोध होतो आणि त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी हजारदा हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
हजारदा या शब्दामुळे वाक्यातील क्रिया हजार वेळा घडली आहे असे समजते.
त्यामुळे, हजारदा या शब्दाला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ४
निशा आज काहीशी नाराज आहे.
या वाक्यामध्ये क्रिया किती वेळा घडत आहे याचा निश्चित बोध होत नाही मात्र क्रिया घडण्याचे परिमाण दर्शविण्यासाठी काहीशी हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
त्यामुळे, काहीशी या शब्दाला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरण क्र. ५
सोनालीला ती कविता खूप आवडते. तिने ती कविता शंभरदा वाचली आहे.
पहिल्या वाक्यामध्ये कविता आवडण्याची क्रिया किती वेळा घडत आहे याचा निश्चित बोध होत नाही मात्र क्रिया घडण्याचे परिमाण दर्शविण्यासाठी खूप हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
त्यामुळे, खूप या शब्दाला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
तसेच, दुसऱ्या वाक्यामध्ये वाचनाची क्रिया किती वेळा घडत आहे याचा निश्चित बोध होतो आणि त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी शंभरदा हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.
शंभरदा या शब्दामुळे वाक्यातील क्रिया शंभर वेळा घडली आहे असे समजते.
त्यामुळे, शंभरदा या शब्दाला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.