केवलप्रयोगी अव्यय – विषय सूची
केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय?
मराठी वाक्यात केवळ वापरायचे किंवा केवळ त्यांचा प्रयोग करायचा म्हणून जे शब्द वापरले जातात, त्यांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द असे म्हणतात.
आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द असे म्हणतात.
केवलप्रयोगी अव्ययाची काही वैशिष्ट्ये
- वाक्यात केवळ वापरायचे म्हणून केवलप्रयोगी अव्ययाचा उपयोग केला जातो.
- मनातील विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी या अव्ययाचा वापर करतात.
- केवलप्रयोगी अव्यय हे वाक्याच्या आरंभी येतात. ते पूर्ण वाक्याचा भाग नसतात.
- केवलप्रयोगी अव्ययाचा वाक्याशी संबंध नसतो.
- वाक्याच्या दृष्टीने केवलप्रयोगी अव्यये अर्थहीन वाटत असली तरी भावना व्यक्त करण्यासाठी ते एक प्रभावी साधन आहे.
- केवलप्रयोगी अव्यये ही वाक्यांना शोभा आणतात.
- केवलप्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग केला जातो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
शाबास! अशीच प्रगती कर.
वरील वाक्यात ‘शाबास’ हा शब्द केवलप्रयोगी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये कौतुकाची थाप देण्यासाठी ‘शाबास’ हे केवलप्रयोगी अव्यय वापरलेले आहे.
उदाहरण क्र. २
ओहो! किती सुंदर चित्र आहे.
वरील वाक्यात ‘ओहो’ हा शब्द केवलप्रयोगी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये चित्राची स्तुती करण्यासाठी ‘ओहो’ हे केवलप्रयोगी अव्यय वापरलेले आहे.
उदाहरण क्र. ३
वा! मस्त झालंय थालीपीठ.
वरील वाक्यात ‘वा’ हा शब्द केवलप्रयोगी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये थालीपीठ चांगलं झालंय हे सांगण्यासाठी ‘वा’ हे केवलप्रयोगी अव्यय वापरलेले आहे.
उदाहरण क्र. ४
शी! मला शेपूची भाजी अजिबात आवडत नाही.
वरील वाक्यात ‘शी’ हा शब्द केवलप्रयोगी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये शेपूच्या भाजीचा तिरस्कार आहे किंवा ती नावडती भाजी आहे हे दर्शविण्यासाठी ‘शी’ हे केवलप्रयोगी अव्यय वापरलेले आहे.
उदाहरण क्र. ५
छे! तो तर तिकडे जातच नाही.
वरील वाक्यात ‘छे’ हा शब्द केवलप्रयोगी अव्यय म्हणून वापरलेला आहे.
या वाक्यामध्ये विरोध दर्शविण्यासाठी ‘छे’ हे केवलप्रयोगी अव्यय वापरलेले आहे.
केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार
केवलप्रयोगी अव्ययाचे साधारणपणे पुढील प्रकार आहेत.
१. हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – वा, वावा, आहा, ओहो, अहाहा इत्यादी.
२. शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – अरेरे, अगाई, अयाई, हायहाय, हाय इत्यादी.
३. आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – आं, अबब, बापरे, अरेच्चा, अहाहा इत्यादी.
४. प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – शाबास, भले, वाहवा, छान, फक्कड, खासच, भारी इत्यादी.
५. संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – हां, ठीक, बराय, अच्छा इत्यादी.
६. विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – छे, छट, छेछे, अंहं, हॅट इत्यादी.
७. तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – हट्, धिक्, थुः, हुड, फुस इत्यादी.
८. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – अहो, अरे, अगं, ए, बा, रे इत्यादी.
९. मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय
उदाहरणार्थ – चुप, चिप, गप इत्यादी.