समास आणि विग्रह, तसेच बहुव्रीही समास हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
प्रादिबहुव्रीही समास
बहुव्रीही समासाचे पहिले पद जर प्र, परा, अप, दुर, सु, वि अशा उपसर्गांनी युक्त असेल, तर त्या बहुव्रीही समासाला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.
प्रादिबहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये
- प्रादिबहुव्रीही समास हे प्रथमतः बहुव्रीही समासाचे उदाहरण असले पाहिजे.
- या समासामधील दोन्ही पदांमधून तिसऱ्या एखाद्या पदाचा बोध होतो.
- या समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दुर, सु, वि अशा उपसर्गांनी युक्त असते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
सुमंगल = पवित्र आहे असे ते
‘सुमंगल’ हा एक सामासिक शब्द आहे, तर ‘पवित्र आहे असे ते’ हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याचे पहिले पद ‘सु’ या उपसर्गाने युक्त आहे.
त्यामुळे या समासास ‘प्रादिबहुव्रीही समास’ असे म्हणतात.
उदाहरण क्र. २
विख्यात = विशेष ख्याती असलेला असा तो
‘विख्यात’ हा एक सामासिक शब्द आहे, तर ‘विशेष ख्याती असलेला असा तो’ हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याचे पहिले पद ‘वि’ या उपसर्गाने युक्त आहे.
त्यामुळे या समासास ‘प्रादिबहुव्रीही समास’ असे म्हणतात.
उदाहरण क्र. ३
प्रज्ञावंत = बुद्धी असलेला असा तो
‘प्रज्ञावंत’ हा एक सामासिक शब्द आहे, तर ‘बुद्धी असलेला असा तो’ हा त्याचा विग्रह आहे.
या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याचे पहिले पद ‘प्र’ या उपसर्गाने युक्त आहे.
त्यामुळे या समासास ‘प्रादिबहुव्रीही समास’ असे म्हणतात.
प्रादिबहुव्रीही समासाची इतर उदाहरणे
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
सुलोचना | सुंदर आहेत नयन जिचे अशी ती |
दुर्गुणी | वाईट आहेत गुण ज्याचे असा तो |
विधवा | नाही सधवा अशी ती |