पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया पुढील काळात पूर्ण झालेली असेल किंवा ती क्रिया भविष्यात केव्हातरी पूर्णपणे संपलेली असेल, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा पूर्ण भविष्यकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
सोहमने निबंध लिहिलेला असेल.
या वाक्यामध्ये निबंध लिहिण्याची क्रिया ही भविष्यकाळात पुढे पूर्ण झालेली असेल, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भविष्यकाळ समजावा.
उदाहरण क्र. २
गोरक्षने उद्या सर्व गृहपाठ पूर्ण केलेला असेल.
या वाक्यामध्ये गृहपाठ करण्याची क्रिया ही भविष्यकाळात पुढे पूर्ण झालेली असेल, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भविष्यकाळ समजावा.
उदाहरण क्र. ३
परवा संध्याकाळपर्यंत बाबा पुण्याहून घरी परत आलेले असतील.
या वाक्यामध्ये परत येण्याची क्रिया ही भविष्यकाळात पुढे पूर्ण झालेली असेल, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भविष्यकाळ समजावा.
उदाहरण क्र. ४
पुढील काही दिवसांत पक्षी स्थलांतर करून युरोपातून भारतात आलेले असतील.
या वाक्यामध्ये पक्ष्यांची भारतात येण्याची क्रिया ही भविष्यकाळात पुढे पूर्ण झालेली असेल, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भविष्यकाळ समजावा.